पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 88.38 टक्के लागला असून, औरंगाबाद विभागाचा ७५.२० टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी असून, बारावीपाठोपाठ दहावी परीक्षेच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला असून, निकालात तब्बल १२ टक्के घट झाली आहे. यंदाच्या निकालात औरंगाबाद विभागाची राज्यात पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. राज्यातील तब्बल १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (८८.३८ टक्के) तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा (६७.७टक्के) लागला आहे. यंदा एकूण १६ लाख दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ७० हजार ८८७ तर विद्यार्थिनींची संख्या ७ लाख ४८ हजार ७१५ इतकी होती. त्यापैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींचा निकाल हा ८२.८२ टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल ७२.१८ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या तुलनेत १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे गुणफुगवटा आटला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणार्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे, असे डॉ.काळे यांनी सांगितले.
निकालाची वैशिष्ट्ये
- मुलींना ८२.८२ टक्के तर मुलांना ७२.१८ टक्के गुण
- परीक्षा दिलेले एकूण विद्यार्थी - १६,१८,६०२
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १२,४७,९०३
- दिव्यांग -८३.०५ टक्के गुण
- १००टक्के गुण - २० विद्यार्थी (१६ लातूर, १ अमरावती, औरंगाबाद ३)
- १०० टक्के निकाल लागलेल्या शाळा -१७९४
- प्रथम श्रेणीमध्ये ४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी उतीर्ण
- १९विषयांचा निकाल १०० टक्के
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
पुणे ८२.४८
कोकण ८८.३८
कोल्हापूर ८६.५८
मुंबई ७७.०४
औरंगाबाद ७५.२०
लातूर ७२.८७
नागपूर ६७.२७
अमरावती ७१.९८
नाशिक ७७.५८